श्री. खंडोबा मंदिर, कडेपठार या मंदिराचा “कलशारोहन” सोहळा

श्री. क्षेत्र खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने श्री. खंडोबा मंदिर, कडेपठार या मंदिराचा “कलशारोहन” सोहळा अत्यंत दिमाखदार रीतीने, आनंदात उत्साहात, जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. मंत्रोउच्चार, भजन, कीर्तन आणि नामघोषाने अवघा मंदिर परिसर दणाणून निघाला. भंडार्याची उधळण, वाद्यांचा गजर, गजरावर आपसूक थिरकणारे पाय आणि कडेपठाराच्या राजाचा जयघोषाने तल्लीन झालेले भाविक, केवळ न भूतो ना भविष्यती असा देखणा सोहळा. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे अहोभाग्य कि त्यांना महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री. खंडोबा मंदिराच्या “कलशपूजन” करण्याचा मान मिळाला. श्री. संतोषशेठ खोमणे (पाटिल) यांच्या हस्ते नारळ वाढवुन कळसाच्या मिरवणूकिची श्री. स्वामींच्या रथात सुरवात करण्यात आली. मिरवणुकीत समस्त ग्रामस्त तसेच मा. नगरसेवक हेमंतशेठ सोनवणे, मार्तंड देवस्थान चे विश्वस्त श्री पंकजशेठ निकुडेपाटिल, उद्योजक श्री. विठठलशेठ सोनवणे, श्री. राहुलशेठ दोडके, मा.नगरसेवक श्री. दिलीपराव गायकवाड, श्री. पुंडलिक दावलकर, श्री. नितिनमामा कदम श्री. ह्रिषीकेश सातभाई, सोनू बारभाई, सुधीर सातभाई आदी सहभागी झाले होते. श्री. राजाभाऊ मोरे आणि त्यांचे चिरंजीव संगीत सम्राट श्री. प्रथमेश मोरे यांच्या साथीने शोभा यात्रा सोहळा वाजत गाजत संपूर्ण शहरात सर्वांना दर्शन देत कडेपठार गडाच्या पायथ्याशी पोहचला आणि त्यानंतर खरं तर अत्यंत रमणीय असा सोहळा सुरु झाला याचे संपूर्ण श्रेय श्री. शैलेश राऊत, अमित भापकर, अमोल खोमणे, अक्षय गोडसेपाटील, रोहित लाखे, तुषार कुदळे, गणेशशेठ थोरात, अविनाश झगडे, पप्पु गावडे व असंख्य खांदेकरी यांनाच जाते. कळसाची पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत पालखी खांद्यावर नाचवत घेऊन जाताना अगदी दसरा सोहळ्याची आठवण होईल असाच भास होत होता खरं तर तसाच दिमाखदार सोहळा, अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा. सर्व खांदेकरी एवढे उत्साही होते कि तो सोहळा संपूच नये असेच त्यांना वाटत होते. पुढच्या दिवशी परमपूज्य श्री. बाबाजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या श्रद्धेने ”कलशारोहन” संपन्न झाले, तत्पूर्वी श्री. व सौ. दिलीप देशमुख, निवृत्त सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग, श्री. व सौ. राजकुमारजी लोढा, विश्वस्त, श्री. मार्तंड देवसंस्थान, जेजुरी ( सर्वात महत्वाचे ज्यांनी या शिखराचे काम स्वखर्चाने करून घेतले), श्री. व सौ. वाल्मिक लांघी, विश्वस्त श्री. क्षेत्र खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी, तसेच गावकरी, खांदेकरी आणि मानकरी यांचे प्रतिनिधी श्री. व सौ. दीपक राऊत, श्री व सौ. माळवदकर आणि भूपाळी पुजेचे नित्य वारकरी श्री. व सौ. विवेक निकुडे यांच्या हस्ते पुण्याहवाचन, रुद्राभिषेक आणि हवन अगदी मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने पार पडले. पौरोहित्याचे सर्व जबाबदारी श्री. शशिकांत सेवेकरी यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी गुरुजींनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडला, त्यातच श्री. नंदुकाका आगलावे गुरुजी यांच्या पूजा, जोगवा, आरत्या यांनी आणखीनच रंगत वाढविली आणि सोहळा दिवसभर खंडेरायाच्या नामघोषात डुलत राहिला. शोभा यात्रेच्या रात्रीच्या प्रसादाची, दुसऱ्या दिवशीच्या चहा नाश्ता आणि महाप्रसादाची संपूर्ण जबादारी लीलया उचलली ती श्री. संतोष खोमणे आणि श्री. सचिन खोमणे या पाटिल बंधूनी. पुरंदर- हवेलीचे आमदार श्री. संजयजी जगताप हे प्रकृतिअस्वथ्या मुळे सोहळ्यास उपस्थितत राहू शकले नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करून सोहळ्यास दूरध्वनी वरून अनेक शुभेच्छा दिल्या आणि न्यासाने देखील त्याचा मनपूर्वक स्वीकार केला. श्री. क्षेत्र खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी तर्फे विश्वस्त श्री. रामचंद्र दिडभाई, वाल्मिक लांघी, श्री. योगेश मोरे आणि श्री. नितीन कदम यांच्या हस्ते उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे, मदतनिसांचे, मानकऱ्यांच्या, गावकऱ्यांचे, खांदेकऱ्यांचे स्वागत आणि आभार व्यक्त कारण्यात आले आणि अश्या तऱ्हेने दैदिप्यमान असा “कलशारोहन सोहळा”संपन्न झाला. श्री. क्षेत्र खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी मधील सर्व कर्मचारी वृन्द यांचे मोलाचे सहकार्य संपूर्ण सोहळ्यास लाभले.