खंडोबा मंदिरा बद्दल
श्री मल्हारी मार्तंड प्रसन्न
मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्ती ने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याठिकाणी अवतरल्या नंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली "या भूमीवर लिंग रूपाने आपण सदैव राहावे." सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने तथास्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. आजचा कडेपठार तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे साडेतीन किलोमीटरवर कऱ्हे पठारावर कडेपठार देवतालिंग हे श्रीखंडोबाचे मूळस्थान आहे, यालाच काही लोक जुनागड असेही म्हणतात. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळ विहीर परिसर आहे, इथपर्यंत डांबरी सडक असल्याने गाडीने जाता येते व तेथून पुढे पायरी मार्गाने दीड किलोमीटर अंतर चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. वाटेमध्ये हेगडे प्रधान मंदिर, भगवानगिरी मठ, साक्षीविनायक गणपती मंदिर व श्रीराम मंदिर हि मंदिरे लागतात. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात असावी परंतु कालौघात बरीच पडझड झालेली निदर्शनास येते. पूर्वी पूर्व दिशेकडून मंदिर आवारामध्ये प्रवेश होत होता ज्याच्या खुणा आजही स्पष्ट आहेत, तेथून पुढे प्रवेश केल्यानंतर समोर नंदिमंडप. नंदी मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्यामागे एक कथा सांगितली जाते 'गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली त्याचे प्रतिक म्हणून श्रीमार्तंड भैरवाच्या नंदिसोबत गणांचा नंदी सुद्धा सेवेसी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली.'नंदी मंडपापुढे मोठे दगडी कासव आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सर्वात आधी सदर, मध्य गर्भगृह व मुख्य गर्भगृह असे विभागलेले आहे. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्ती आहेत. मध्य गर्भ गृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये खालील बाजूस खंडोबा-म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग, घोडा, कुत्रा, व महिषासुर मर्दीनीची यांच्या मूर्ती आहेत. त्यापाठीमागे प्रभावळी मध्ये श्रीखंडोबा व म्हाळसा यांच्या पितळी मूर्ती आहेत, त्यांच्या पाठीमागे भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी मूर्ती आहे, त्यासोबतच दोन्ही बाजूना देवीमूर्ती आहेत. कोनाड्याच्या बाहेरील एका बाजूस गणेशाची संगमरवरी मूर्ती व दुस-या बाजूस श्रीमार्तंड भैरवाची छोटी दगडी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोलीमध्ये देवाचे शेजघर आहे. मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडे पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे. तर दक्षिणेकडील बाजूस ओव-या व एक प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडील ओवरीमध्ये देवाचे भंडार गृह आहे, घटस्थापनेवेळी उत्सव मूर्ती या ठिकाणी बसवितात. भंडार गृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील काळामध्ये स्थापना झालेली घोड्यावर स्वार झालेल्या श्रीखंडोबाची मूर्ती आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्रीपंचलिंग मंदिर आहे. आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे व त्यावर बगाडाचा खांब आहे. संन्यासी आणि अध्यात्मिक गुरु यांचे दृष्टीने या स्थानाला अनन्य साधारण महत्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी समाधीस्थळे आढळतात. मंदिर कोणी व केव्हा बांधले याविषयी कुठेही उल्लेख आढळत नाही. श्रीराम मंदिराव्यतिरिक्त इतरत्र कुठेही शिलालेख सापडत नाहीत.
!! यळकोट यळकोट जय मल्हार !!