उत्सव
हा दिवस श्री मार्तंड भैरवाचा अवतार दिवस असून मणी आणि मल्य या दैत्यांच्या त्रासाला कंटाळून पीडित ऋषीमुनींनी श्री. शंकराची विनवणी केली. श्री. शंकराने चैत्र पौर्णिमा मध्यान्न् प्रहरी श्री मार्तंड भैरवाचा अवतार तीर्थक्षेत्र श्री कडेपठारी धारण केला. या दिवशी जेजुरीत , कडेपठारावर भक्तांची गर्दी उसळते. जेजुरी गड, कडेपठार गड, जेजुरी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो, कुलदैवताच्या कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची झुंबड सर्वत्र पाहावयास मिळते.
ज्या सोमवारी अमावस्या येते त्या दिवसास सोमवती अमावस्या असे म्हणतात. या सोमवती अमावास्या वर्षातून सधारणतः दोनदा आणि क्वचितच तीनदा येतात. सोमवती अमावश्या हा काळ नदी स्नानासाठी पर्वकाळ मानला जातो. या दिवशी श्री खंडोबाचा पालखी सोहळा असतो. श्री. खंडेरायाची पालखी जेजुरी गडावरूनत निर्धारित मुहूर्तावर कऱ्हानदी स्नानासाठी प्रस्थान करते. पालखी सोहळ्यात उधळणाऱ्या भंडाराने सगळे वातावरण सुवर्णमय होते. देवी बाणाई मंदिराकडून देव गड उतरून नंदीचौक, गोसावी मठ, छत्री मंदिर, जानाई मंदिर मार्गाने धालेवाडी रस्त्याने पालखीमधून देव कऱ्हा नदीवर पोहोचतात. मंदिर ते कऱ्हानदी हे अंतर सुमारे ७ कि.मी आहे. कऱ्हा नदीवर विसाव्याजवळ उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नान घालण्यात येते. परतीच्या मार्गावर धालेवाडी गावातील बाबीर मंदिर, फुलाई माळणीचा विसावा या मार्गाने पालखी जेजुरी मध्ये येऊन जानाई मंदिरासमोर विसावते. रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहोचते. रोजमरा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते .
तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावरील उत्सवांपैकी एक महत्वाचा आणि मुख्य उत्सव . श्री. मार्तंड भैरावांनी मणी आणि मल्ल या राक्षसावर विजय मिळवल्यानंतर आपल्या परिवारासह कडेपाठरवर आले, तेव्हा समस्त देवगणांनी आणि ऋषींमुनींनी श्री. खंडोबाची / श्री मार्तंड भैरवांची पूजा केली तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. हा दिवस कडेपठारी गणपुजा म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी रात्री देवास भंडाराची पूजा बांधली जाते, स्वयंभू लिंग भंडाऱ्याने आच्छादली जातात. मंदिरातून देवाचा छबिना निघतो आणि मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते, सोबत वाघ्या मुरळी, घडशी खंडोबाची गीते वाजवून, गाऊन छबिना रमावतात. गर्भगृह भाविकांनि वाहिलेल्या भंडाराने भरून जाते. छबिन्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो, सकाळी देवाच्या अंगावरील भंडारा भाविकांना वाटण्यात येतो. आणि संपूर्ण रात्र चाललेला गणपूजेचा उत्सव संपन्न होतो.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. प्रतिपदेस कडेपठारी घटस्थापना करून उत्सवमूर्ती भंडारागृहात विराजमान होतात. नवरात्र काळात रोज दिवसभर देवासमोर वाघ्या- मुरळीचा हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो. रात्री लोक कलाकार नृत्य गाणी सादर करून हजेरी लावतात. अनेक भाविक सकाळी नदी वरून पाण्याची कावड देवाला आणतात. नवरात्र संपेपर्यंत हा दिनक्रम असतो. कडेपठार गड विद्युत रोषणाईने उजळून निघतो. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जेजुरी गडावरील पालखी शिलंगणासाठी रमण्याकडे प्रस्थान करते, हा सोहळा प्रेक्षणीय असतो. कडेपठारवरील पालखी रात्री रमण्याकडे प्रस्थान करते लोक कलाकारांच्या गीत संगीताच्या साथीमध्ये हवाईच्या प्रकाशात डोंगर माथ्यावरून जाणारा हा पालखी सोहळा विलक्षण थराराचा असतो. पालखी मार्गात शिलंगणाचे सोने लुटून हा सोहळा रमण्याचे माथ्यावर येऊन पोहोचतो. जेजुरी गडावरील पालखी रमन्यामध्ये डोंगराच्या पायथ्याला विसावते आणि डोंगर माथ्यावरील कडेपठारची पालखी व पायथ्याची जेजुरी गडावरील पालखी दोन्हीकडे दारूकामाचे आतिषबाजीस सुरुवात होते. लोकवाद्याची साथ भक्ताचे डोळे आणि कान दोन्ही तृप्त करून टाकते आणि या उत्साहाने भरलेल्या भक्तिमय वातावरणात दोन्ही पालख्यामधील आरशामधून दोन्ही देवांची नजर भेट होते आणि दोन्ही पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात. कडेपठारची पालखी बानाई भेटीनंतर मंदिरात पोहोचते हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे ४ किलोमीटर अंतराचा आहे. रोजमरा वाटून येथील उत्सव संपतो. दुसरीकडे गडावरील पालखी शिलंगणाचे सोने लुटून गावात पोहोचते आतिषबाजीत पायघड्याचे स्वागतात पालखी सकाळी गडावर पोहोचते . येथे अनेक लोककलाकार हजेरी लावतात. हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे ६ किलोमीटर अंतराचा आहे. रोजमरा वाटून पालखी सोहळ्याची सांगता होतानाच खंडास्पर्धा सुरू होतात. अनेक तरुण आपल्या शक्ती आणि युक्तीचे कलेचे प्रदर्शन करतात. विजेत्यांना पुरस्कारही दिले जातात. सुमारे १८ तास चालणारा हा लोककला, लोकशक्ती लोकश्रद्धेचा हा सोहळा केवळ अवर्णनीय असतो. तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर खांदेकरी, मानकरी, सेवेकरी आणि ग्रामस्थांचा यथेच्य सन्मान केला जातो. या वेळी श्री.खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने सर्वांसाठी खास अन्नदानाचे नियोजन केले जाते. रात्रभर चालणाऱ्या या सोहळ्यात न्यासातर्फे पालखी मार्गावर लाईट आणि पाण्याचे देखील नियोजन केले जाते.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर श्री. खंडोबाची घटस्थापना होते. श्री खंडोबा देवाचे मणी आणि मल्ल या दैत्यांबरोबर युद्ध झाले ते हे सहा दिवस खंडोबाचे षडरात्र म्हणून साजरे होतात. श्री खंडोबाने मणी मल्लावर विजय मिळवला व ऋषीचे विनंतीवरून लिंग रूपाने तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर प्रगटले आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस कडेपठारी घटस्थापना करून उत्सव मूर्ती भंडारगृहात बसविल्या जातात. रोज रात्री जेजुरी गड रोषणाईने उजळून निघतो. गडावर दिवसभर देवासमोर वाघ्या- मुरळीचा हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो. कडेपठारावर रोज अन्नदान सुरू असते, रात्री देवास दुधाचा अभिषेक घातला जातो. खंडोबा म्हाळसा विवाह वेळी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस सायंकाळी तेलहंडा निघतो आणि मंदिर प्रदक्षिणा घेतो यात भाविक भाविक मनोभावे तेल घालतात या तेलाने रात्री तेलवण केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी हा चंपाषष्ठीचा दिवस या दिवशी श्री खंडोबाने श्री मार्तंड भैरवाने विजय मिळवला , हा दिवस भाविक गडावर किंवा आपापल्या घरी, मंदिरात कुलधर्म कुलाचाराने साजरा करतात. या दिवशी कडेपठारावर मोठी यात्रा असते भाविक पहाटेपासूनच लोक विविध कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी करतात. कडेपठारावर भाविक त्यांचा चालू असलेला सहा दिवसांचा उपवास गडावर भरीत रोडगा खाऊन सोडतात.
ही भटक्या जाती जमातीची यात्रा . या दिवशी जेजुरी मध्ये बंगाली पटांगणावर गाढवाचा बाजार भरतो. महाराष्ट्र, गुजरात मधून गाढव आणि खेचरांचे व्यापारी येथे जमतात. बेलदार, वडारी, कुंभार, परीट इत्यादी जातीचे व्यवसाय गाढवावर अवलंबून असतात अशी मंडळी येथे येतात. गाढवांच्या बाजारात यांची मोठी उलाढाल होते. गाढवाचा वाहतुकीसाठी वापर कमी झाल्याचा परिणाम या बाजारावर सद्यस्थितीत होत आहे. पौष पोर्णिमचे दुसरे दिवशी वेंदू समाजातील पैलवानाचे कुस्त्या येथे होतात व वेंदू समाजाची जात पंचायत येथे भरते. पंचमंडळी समाजातील विविध वादावर येथे निर्णय घेतात. ही पंचायत कधी दोन-तीन दिवशी चालते. यावेळी भातू कोलाटी समाजाची जात पंचायत येथे भरते. या पंचायतीमध्ये ही न्यायनिवाडी होतात बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत ही यात्रा बदलत आहे.
माघ पौर्णिमा किंवा माही पौर्णिमा हा देवी म्हाळसेचा जन्मदिन मानला जातो. या यात्रेस मोठ्या प्रमाणावर सोनकोळी समाज कोकणामधून आपआपल्या खंडोबाच्या पालख्या घेऊन देव भेटीसाठी जेजुरीत येतात. त्यामुळे जेजुरी विशेषतः चिंचेचा बाग परिसर फुलून जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराला काठ्या लावण्याचा सोहळा होतो महाराष्ट्राचे विविध भागातून काठया येतात . काठी हा प्रतिकात्मक देव मानला जातो. अशा देवाचे देव भेट करून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी काठी जाते . सुपेचे खैरे, संगमनेरचे होलम व होळकर यांच्या काठ्या मानाच्या मानल्या जातात. इतर अनेक काठी या सोहळ्यात सहभागी होतात.
माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी तीर्थक्षेत्र श्री कडेपठारवर श्री खंडेरायांच्या मुळस्थानाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक खंडेरायांच्या राजधानीत येत असतात. खंडेराय हे शंकराचा अवतार असल्याने अनेक शिवभक्त गडावर दर्शनासाठी एकच गर्दी करतात. श्री खंडोबा देवात व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने भाविकांना खिचडी, राजगिरा याचे वाटप प्रसाद म्हणून केले जाते.
श्रावण महिन्यात स्थानिक लोक तसेस संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक कडेपठाराची वारी करतात. भाविक किंवा स्थानिक कुटुंब दर वर्षी कडेपठारी भंडारा घालतात यास स्थानिं भाषेत हास्म असे म्हणतात. भाविक विविध अन्न पदार्थ आलेल्या इतर भाविकांना वाटप करतात. न्यासातर्फे देखील महिनाभर अन्नदान चालूच असते.
श्रावण शुद्ध पंचमीस नागपूजेकरिता म्हाळसाबाई चे ताट कडेपठार मंदिरातून निघते व वाजत गाजत मंदिराजवळील नागमंदिरात आणले जाते आणि समस्त महिला वर्गाकडून तसेच भाविकांकडून नागदेवतेचे पूजन केले जाते.
श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी दुष्काळातील आपल्या प्रजेला आपले सर्वस्व देऊन टाकणाऱ्या औट घटकेचा राजा श्रीयाळशेठ यांचा स्मृतिदिन असतो. या दिवशी सायंकाळी राजा श्रीयाळ शेठ व त्याचा प्रतिकात्मक राजवाडा यांच्या प्रतिमा तयार करून यांची मिरवणूक काढून त्याचे कडेपठारावरील तळ्यात मनोभावे विसर्जन केले जाते.
आश्विन महिन्यात येणारे प्रत्येक शनिवारी कडेपठार गडावरील मंदिरात देवाचा छबिना काढला जातो. स्थानिक वादक कलाकार आपल्या कलेने हा छबिना रात्रभर रमवितात . रात्री सुरू होणारा हा छबिना मंदिरात प्रदक्षिणा घेऊन पहाटे संपतो.
कार्तिक पौर्णिमेस मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. श्री. खंडेरायांना महापूजा देखील करण्यात येते.
मार्गशीर्ष शुद्ध दशमीस कडेपठारावर प्रयोजनाचा कार्यक्रम होतो, यात येणाऱ्या सर्व भाविकांना अन्नदान करण्यात येते.
मार्गशीर्ष पौर्णिमेस कडेपठारावर दत्त मंदिरात सायंकाळी दत्तजयंती सोहळ्याचे व रात्री रेणुका मातेचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
चैत्र शु. नवमीस कडेपठारावरील श्री राम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने श्री रामजन्म सोहळा पार पडतो. भजन, कीर्तन आणि अन्नदानाने सोहळ्याची सांगता होते.
प्रत्येक महिन्याचे शुद्ध प्रतिपदेस सर्व मंदिराची साफ सफाई होते, मंदिर पाण्याने स्वच्छ धुतले जाते. उत्सव मूर्ती आणि श्री. मार्तंड भैरव यांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात येतो, नवीन पोशाख आणि पगडी परिधान केली जाते.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सकाळी कडेपठारावर संपूर्ण मंदिराची सफाई केली जाते व मिरवणुकीने उत्सव मूर्ती मंदिर समोरील नंदी मंडपात बांधलेल्या झोपाळ्यात बसविल्या जातात. भाविकांकडून रंग खेळला जातो आणि सायंकाळी उत्सव मूर्ती पुन्हा मंदिरात आणल्या जातात. सायंकाळी विविध पदार्थ / भोग, रांगोळी, दीपोत्सव यांनी दिवाळी साजरी होते.