देवराई
🌳 तीर्थक्षेत्र श्री कडेपठार देवराई प्रकल्प 🌳
मंडळी, आपणा सर्वांना कळविण्यास अत्यंतिक आनंद होत आहे कि, आपण महिनाभरापूर्वी देवराईचे जे संकल्पित कार्य हाती घेतले होते ते अल्पावधीतच पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. जागतिक वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून सर्वात महत्वाचा म्हणजेच प्रत्यक्ष वृक्ष लागवडीचा टप्पा मोट्या आनंदाने, उत्साहाने आणि अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडला. अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यन्त सर्वांनी कडेपठारावर येऊन वृक्षरोपण कार्यात सहभागी होऊन तीर्थक्षेत्र श्री कडेपठार देवराई प्रकल्प फुलविण्यात मोलाचा वाट उचलला.
तीर्थक्षेत्रावर वृक्षलागवडीसाठी आतुरलेली धरती, धरणीने पसरलेले अजानबाहू, वरुणराजाची रिपरिप, थंड वाऱ्याची झुळूक, घोंगावणारा वारा, सूर्यनारायणाची हलकीशी झलक, अवतरलेले ढग आणि प्रस्थापित वटवृक्षांनी त्यांच्या नवीन येणाऱ्या पाहुण्यांसाठी केलेल्या टाळ्यांचा कडकडाटात प्रत्यक्ष निसर्गानेच वृक्षारोपण सेवेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आणि वृक्षलागवडी साठी अत्यंत पोषक अशी वातावरण निर्मिती केली.
ज्याप्रमाणे एखादं वासरू आपल्या आईच्या भेटायला बेफामपणे उड्या मारत इकडून तिकडे सैरावैरा धावत असते तितक्याच उत्साहात आलेल्या चिल्ल्या पिल्ल्यानी बेफाम होऊन वृक्ष लागवडीचा आनंद घेतला. जेष्ठ नागरिक मोठ्या श्रद्धेने अगदी भावनाविवश होऊन आपल्या महाराजांच्या चरणी आपल्याला वृक्ष लागवड करायची एक संधी मिळतिये या भावनेने वृक्ष लागवडीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. तरुणांनी सर्वांना मदत करीत, रोपांच्या काढलेल्या प्लास्टिक पिशव्या गोळा करीत, लहानांना मार्गदर्शन करीत, थोरांना आधार देत आणि कोणाला काय हवं नको ते बघत कार्यात उल्लेखनीय सहभाग नोंदविला. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच समाधान आणि एकाच भावना कि महाराजांची सेवा !
कोणी आपल्यासाठी, कोणी वाडवडिलांसाठी, कोणी पर्यावरणासाठी, कोणी समाजसेवेसाठी तर कोणी भगवंतासाठी एक एक खड्डा भरत होतं आणि बघता बघता सगळेच खड्डे नवीन रोपांनी भरून गेले, त्यांना त्यांचं नवीन घर मिळाले आणि आम्हाला त्यांना डोलताना बघून मिळालं ते केवळ निखळ समाधान.
सर्वांनी ठरलेल्या वेळेत कडेपठार गड गाठण्याचा प्रयत्न केला. देवराईचे प्रणेते श्री. रघुनाथ ढोले सर प्रत्यक्षात मार्गदर्शनासाठी कडेपठारावर येणार म्हटल्यावर एक वेगळ्या प्रकारची चेतना संचारली होती. सर सपत्नीक आणि त्यांच्या वनराई संस्थेचे विश्वस्त त्यांचे मित्र श्री. शिंदे साहेबही जोडीला होते. सरानी सर्वांना विशेषतः लहान मुलांना मार्गदर्शन करून सर्वांनी प्रत्यक्ष वृक्ष लागवडीत अगदी शेवटपर्यंत सहभाग नोंदविला. वृक्षारोपणास उपस्थितांमध्ये श्री. ढोले सरांबरोबर प्रामुख्याने श्री. सोरटे दादा, श्री. दिलीपजी थोरात, श्री. डोंबाळे दादा, श्री. मोरे, श्री. येनकर साहेब, श्री. व सौ. वाळिंबे साहेब, श्री. व सौ. ढुमे सर, श्री. अनुप कवडे, श्री. गायकवाड, श्री. भोलाशेठ वांजळे आणि परिवार तसेच पुणे येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करणारे श्री. अजयजी भारदे, श्री. आकाश बिऱ्हाडे, श्री. भार्गव जोशी, श्री. नितीश कुयटे, श्री. संदीप शेंडे सर्वजण सपत्नीक, मुलांसह कार्यात सहभागी होते. त्याचप्रमाणे विश्वस्त श्री. वाल्मिक लांघी, श्री. बाबाजी महाराज, श्री. मयूर दिडभाई, वास्तु विशारद श्री. मंगेशजी डोंबे, श्री. अशोकजी गायकवाड त्यांचे सहकारी, श्री. दत्ता यादव, श्री. मयूर कापरे, श्री. गणेश सुभाने, श्री. विनोदजी परांडे आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी देखील सेवेत आपला सहभाग नोंदविला. अत्यंत महत्वाचे म्हणजे जेजुरी शहरातील शोतोकान जपान ग्लोबल कराटे पुरंदर या श्री. अशोक शिंदे संचालित अकादमीचे सर्व विद्यार्थी या सेवेत हिरीरीने सहभागी होते. अनेक निनावी हात या कार्यात कार्यरत होत.
हा प्रकल्प पाशवी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केलेले श्री. विजूशेठ जगताप (पिंपरी चिंचवड), श्री. सम्राटदादा जगताप (सासवड), श्री. उद्धवजी कवडेदाजी, श्री. सुनिलजी येडे साहेब (पिंपळे गुरव), श्री. जावेदभाई पानसरे, श्री. उमेश गायकवाड, श्री. हनुमंत खोमणे (जेजुरी) गायकवाड बंधू (सासवड), श्री. दीपक नेवाळे (चिखली), श्री बाळासाहेब चौधरी आणि त्यांचा मित्र परिवार (उरुळीकांचन), श्री. माणिक गायकवाड (नीरा), श्री. प्रितेश केदारी, श्री. केदार गोराडे, श्री. म्हस्के, श्री. हनुमंत कड (पुणे) श्री. मनोजजी चिन्वार साहेब (मुंबई) या सर्वांना काही अपरिहार्य कारणास्तव या सेवेत प्रत्यक्ष सहभागी होता नाही आलं परंतु संपूर्ण प्रकल्पात त्यांचाही सहभाग अत्यंत उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण आहे. आम्हाला आपण सर्वांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
“तीर्थक्षेत्र श्री कडेपठार देवराई प्रकल्प” उभारणीत आपले सर्वांचे फार मोलाचे योगदान आहे. आता सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे वरिक्ष संवर्धनाचे, त्याकरिता देखील सर्वांचे योगदान तितकेच महत्वाचे असणार आहे.
ज्या ज्या वेळी आपण गडावर याल त्या त्या वेळी आपण थोडा वेळ आपल्या देवराईला देखील द्या हि विनंती.